ओ बी सी समाज आजही पिछाडीवर का राहिला ?

आनंद क्षीरसागर


कोणताही समाज जेव्हा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पिछाडीवर जातो तेव्हा त्या मागासलेल्या परिस्थितीची कारणे जशी बाह्य असतात त्यापेक्षा जास्त ती त्या समाजाच्या आतच दडलेली असतात. ह्या दृष्टीने विचार करता बहुसंख्य समजल्या जाणाऱ्या ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पिछाडीची अंतर्गत कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील-

ओबीसी समाज अजूनही स्वतः जातिप्रथा मोठ्या अभिमानाने पाळतो. तो इतर ओबीसी समाजातील व्यक्तींशी तसेच दलित समाजातील समाज बंधू भगिनींशी रोटी-बेटीचे संबंध जोडण्यास नकार देतो. यातून ओबीसी समाज कधीही रक्ताने आणि सामाजिकदृष्ट्या एकसंध होत नाही. फक्त राजकीय स्वार्थसाठी एकत्र येणारा ओबीसी समाज जेव्हा इतर वेळी बाकीच्या ओबीसी जाती आणि दलित समाजातील आपल्याच समाज बंधू-भगिनींशी सामाजिक, वैवाहिक संबंध नाकारतो तेव्हा तो आपल्याच हाताने आपल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दुर्बलतेची बीजे पेरत असतो.


भारतातील जातीव्यवस्था ज्या चातृवर्ण व्यवस्थेवर उभी आहे; त्या चातुवर्ण व्यवस्थेमध्ये ओबीसी समाज (शूद्र समाज) हा नेहमीच खालच्या पायरीवर असल्याने पूर्वापार सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला राहिला आहे. त्यामुळे अशा विषम सामाजिक व्यवस्थेमध्ये ओबीसी समाजाने स्वतःची उन्नती करण्यासाठी ब्राह्मणी हिंदू धर्माच्या संस्कृतीला आपलेसे केले. यातून त्यांना दलित समाजासारखे 'वेशीबाहेरचे' आयुष्य जरी वाट्याला आले नाही तरी सवर्ण ब्राह्मणी हिंदू धर्मात त्यांची जागा ही फक्त 'उंबऱ्यापर्यंतच मर्यादित' ठेवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, ज्या तेल्याच्या घाण्यामधून गणपती सारख्या देवाच्या देव्हार्यासाठी तेल तयार केले जाते, ज्या कुणब्याच्या शेतातील दुर्वा, फळे गणपतीपुढे ठेवली जातात, ज्या माळ्याच्या बागेतून फुले तोडून गणपतीला वाहिली जातात, ज्या शिंप्याच्या हातमागातून गणपतीसाठी वस्त्र तयार केले जाते, ज्या लोहाराच्या हाताने घडवलेल्या धातूंच्या ताटात गणपतीची आरती केली जाते त्या आणि अशा सर्व ओबीसी जातींना त्याच गणपतीच्या मंदिरात 'पुजारी' बनण्याचा अधिकार मात्र डावलण्यात येतो. इथे हे स्पष्ट दिसते की ब्राह्मणी सवर्ण हिंदू धर्माला 'बहुजनांची सेवा' चालते परंतु हाच बहुजन ओबीसी समाज जेव्हा धर्मात, सामाजिक, आर्थिक, राजकीय , शैक्षणिक क्षेत्रात आपला 'समानतेचा हक्क' मागतो तेव्हा तो अचानक हिंदू नसून 'खालच्या जातीचा शूद्र' बनतो. ह्या सर्व फसवणुकीला ओबीसी समाज स्वतः कारणीभूत असून अशा वास्तव परिस्थितिकडे स्वतःला 'हिंदू' मानून दुर्लक्ष करतो. यातून बहुजन ओबीसी समाज कधीही स्वतंत्र दृष्टी आणि सामाजिक स्वाभिमान मिळवत नाही. त्यामुळे तो नेहमी मानसिकदृष्ट्या मागासलेलाच राहतो.

आजच्या स्थितीमध्ये ओबीसी समाज हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन धर्माचे अंधानुकरण करतो. ह्या धर्मांच्या नावाखाली होत असलेल्या धंद्याला आणि राजकारणाला त्या धर्मातील ओबीसी समाज जाब विचारत नाही. विशेषतः हिंदू धर्मातील बहुसंख्य असलेला ओबीसी समाज आज ब्राह्मण भटशाही, देवभोळेपणा, अंधश्रद्धा, 'ब्राह्मणी हिंदुत्ववाद' आणि हिंदू धर्माच्या नावाखाली लादल्या गेलेल्या ब्राह्मणी धर्माच्या पूर्ण आहारी गेला आहे.ओबीसी समाज स्वतःचाच जाज्वल्य इतिहास विसरला आहे की ज्या काळात समुद्र प्रवास निषिब्ध मानला जात असे; त्या काळात बहुजन समाजातून जन्माला आलेले शिवाजी राजे यांनी ही अंधश्रद्धा नाकारून खुल्या समुद्रात रयतेच्या रक्षणासाठी पराक्रमी 'आरमर' उभे केले. ज्या बहुजन समाजात जगद्गुरू संत तुकाराम जन्माला आले त्यांनी "भेदाभेद अमंगळ" आणि "ऐसे कैसे झाले भोंदू? कर्म करोनि म्हणती साधू" हा सत्याचा परखड विचार दिला.


याच बहुजन समाजातून जन्माला आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समस्त ब्राह्मणशाही आणि जातिव्यवस्थेला टक्कर देऊन बहुजन समाजासाठी आणि विशेषतः दलित बहुजन महिलांसाठी भारतातील पहिली शाळा काढली. ज्या बहुजन समाजातून डॉ. आंबेडकर जन्माला आले त्यांनी संपूर्ण भारताला भगवान बुद्धाचे तत्वज्ञान पुन्हा परिचित करून दिले. जो हिंदू ओबीसी समाज भगवान बुद्ध हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतारच आहेत असा दावा करतो, त्याच भगवान बुद्धाचा आणि डॉ. आंबेडकर यांचा फोटो आपल्या घरात लावायला मात्र नकार देतो. याचे कारण बहुसंख्य ओबीसी समाज आजही डॉ.आंबेडकर, भगवान बुद्ध, महात्मा फुले यांना आपल्या ओबीसी बहुजन समाजाचे समाज नायक मानत नाही. हे असेच आहे जसे आपल्याला जन्म देणाऱ्या आणि खस्ता खाऊन मोठे करणाऱ्या आपल्याच आई- वडिलांना आपण नाकारणे आणि त्यांचा अपमान करणे होय. जोपर्यंत बहुजन ओबीसी समाज ही चूक करत राहील तोपर्यंत तो आपल्याच हाताने आपल्या हातापायात सामाजिक, राजकीय, आर्थिक गुलामगिरीची साखळदंड घालत राहील.

आज बहुसंख्य ओबीसी समाज महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, भगवान बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर यांचे समाज परिवर्तनाचे विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात पूर्णपणे उदासीनता दाखवतो. ह्या महामानवांची ओबीसी समाज एक वेळ देव्हाऱ्यात पूजा करेल, परंतु त्यांच्या विचारांवर चालून कृती करत नाही. यामुळे बहुजन समाज स्वतःची ओळख विसरून ब्राह्मणी विचारांना आपली ओळख मानतो. हेच बहुजन ओबीसी समाजाच्या गुलामगिरीचे मुख्य कारण आहे. हे असे आहे, जसे की कोकराने आपल्या मानेवरून सूरी फिरवणाऱ्या कसायालाच आपला मित्र मानणे होय. यातून काय परिणाम कोकराला भोगावा लागतो हे वेगळे सांगायला नको. ह्या गैरसमाजामधून ओबीसी समाज जितक्या लवकर बाहेर निघेल, तितक्या लवकर ओबीसी समाजाची खऱ्या अर्थाने प्रगतीची घोडदौड सुरु होईल.

आजचे युग हे संघटनेचे आहे. जो समाज स्वतःच्या स्वतंत्र विचारांवर, स्वाभिमानातून स्वतःची संघटना काढेल, टिकवेल, वाढवेल तोच आजच्या ह्या सामाजिक, आर्थिक, राजकीय संघर्षाच्या स्पर्धेच्या जगात टिकणार आहे. दुसऱ्या समाजाच्या उधारीवर घेतलेल्या वैचारिक ओळखीतून जोपर्यंत ओबीसी बहुजन समाज आपली सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वाटचाल करत राहील तोपर्यंत तो स्वतःचे आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करत राहील. यासाठी बहुजन ओबीसी समाजाला प्रयत्नपूर्वक स्वतःच्या बुद्धीने विचार करून आणि स्वतःच्या पायावर आपली संघटना चालवावी आणि वाढवावी लागणार आहे.

बहुजन ओबीसी समाजामध्ये तरुण नेतृत्व हे अजूनही बहुजन समाजाच्या लोक शिक्षणावर काम करताना दिसून येत नाही. ओबीसी समाज आज पूर्णपणे बौद्धिक अंधकारामध्ये आहे. त्याला आपल्या हक्कांबद्दल जागृती करून देणाऱ्या लोकशिक्षणाची अत्यंत गरज आहे. ओबीसी समाजातील तरुण नेतृत्वाने हे नक्की लक्षात ठेवावे की कोणत्याही मोठ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कामाची पायाभरणी त्या समाजाची जागृती करून त्याला आपल्या हक्क आणि स्वाभिमानाबद्दल जिवंत करून होते. अशा प्रत्येक प्रयत्न्नांना बहुजन ओबीसी समाजातील प्रत्येक बंधू भगिनींनी सर्वोतोपरी मदत करणे गरजेचे आहे.


भारताच्या स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. ह्याचा अर्थ ओबीसी समाजाची लोकसंख्या भारतात आणि महाराष्ट्रात किती आहे याची कोणतीही नोंद आज सरकारकडे नाही. सर्व राजकीय पक्षांच्या सरकारांनी सत्ता भोगूनसुद्धा ओबीसी समाज आपल्याच देशात अनोळखी जीवन जगत आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की, १५ ऑगस्ट १९४७ मध्ये ओबीसी समाज फक्त गोऱ्या साहेबाच्या गुलामीतून मुक्त झाला. परंतु तो अजूनही आपल्याच देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, बौद्धिकदृष्ट्या गुलामच आहे. बहुजन ओबीसी समाजाच्या स्वातंत्र्याची लढाई अजूनही संपली नसून ती आताशी सुरु झाली आहे.


लेखक आनंद क्षीरसागर, ह्यांनी फर्ग्युसन कॉलेज, पुणे इथून 'मायक्रोबायोलॉजी' आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई इथून 'डेव्हलपमेंट स्टडीस' मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या ते ‘नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी’, बंगळुरू मधून 'मानव अधिकार कायदयाचे' शिक्षण घेत आहेत. तसेच ते नाट्य आणि हिप-हॉप कलाकार देखील आहेत.

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn