'गणेश उत्सव' आणि बहुजनांची 'येड्यांची जत्रा'

आनंद क्षीरसागर
आज ' गणेश चतुर्थी'! माझ्यासारख्या दलित बहुजन समाजातील मागासलेल्या 'खालच्या जातीची' हिंदू माणसे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. लहान असताना गणपती हा माझा 'लहान मित्रच' आहे, अशी अनेकवेळा माझी धारणा होत असे. त्यामुळे जेव्हा घरी आणि आमच्या अठरा पगड जातीधर्माच्या रहिवासी बिल्डिंगमध्ये गणपतीचे आगमन होत, तेव्हा माझ्या बाल मनाला खूप आनंद होई. तसेच जेव्हा गणपतीचे विसर्जन होत असे, तेव्हा मनामध्ये दुःख आणि निराशा दाटून येई. मला पूर्ण खात्री आहे की, गणेश उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक हिंदू दलित बहुजन समाजातील स्त्रिया, पुरुष, अबालवृद्ध ह्या भावनेतून दर वर्षी जातात. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, ठाणे यांसारख्या शहरात आणि गावागावात आता ह्या सणाला फक्त धार्मिकच नाही तर राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट रंग देखील मिळाला आहे. इतकेच काय, आता टीव्ही सिरीयल मधले 'नट-नटी' गणेश उत्सवांना गर्दी खेचण्यासाठी बोलावले जातात तसेच काही सेलिब्रिटी 'सेलिब्रिटी ढोलताशा पथकात' ढोल पिटून पैसे आणि सामान्य लोकांची वाहवा मिळवतात. त्यात त्यांना पैसा मिळवण्यासोबत आम्ही हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीची मोठी सेवाच करत आहोत असा फुकटचा अज्ञानी अभिमान वाटत असतो.


मुळात ह्या सणाचा 'सार्वजनिक गणेश उत्सव' असा उपयोग करून बाळ गंगाधर टिळकांनी इंग्रज सत्तेविरुद्ध तमाम हिंदू समाजाला एकत्र आणायचा प्रयत्न केला. बहुजन समाजाने देखील ह्याला अनेक वर्षे मनापासून पाठिंबा दिला. परंतु दलित बहुजन समाजाचे ह्याच हिंदू धर्माच्या जातिव्यवस्थेतील असणारे स्थान आणि आजच्या गणेश उत्सवाचे स्वरूप पाहिल्यास खरेच गणेश उत्सव हा हिंदू समाजातील दलित बहुजन समाजातील लोकांचा सण आहे का? आणि असेल तर तो त्यांच्या किती हिताचा आहे? हा गंभीर प्रश्न तयार झाल्यावाचून राहत नाही.


ही कटू सत्यपरिस्थिती सांगण्यास माझ्यासारख्या बहुजनाचे काळीज पिळवटून निघते की, ज्या हिंदू धर्मातील दलित बहुजन समाज गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो, त्या हिंदू दलित बहुजन समाजातील तेली, माळी, नाभिक, शिंपी, महार, मातंग, वाल्मिकी, खाटीक, ढोर, चर्मकार, लोहार, घिसाडी, डक्कलवार, वडार, कैकाडी, वंजारी, कुणबी, कुंभार, पद्मसाळी, साळी, भोई, परदेशी, नंदीबैलवाले, डोंबारी, धनगर,परीट, पोतराज अशा तमाम जातींपैकी कोणीही व्यक्ती (स्त्री अथवा पुरुष) कोणत्याही गणेश मंदिरात 'पुजारी' म्हणून मंदिराच्या गर्भगृहात देवाची पूजा करू शकत नाही. तो अधिकार फक्त 'जानवं' घातलेल्या पुरुष सवर्ण व्यक्तींनाच आहे. बहुजन समाजाला फक्त अशा मंदिरांमध्ये 'भक्त' म्हणून येण्याचा आणि जाताना 'दक्षिणा' देण्याचा अधिकार आहे. परंतु प्रत्येक १० भक्तांपैकी ५ भक्तांपेक्षा जास्त भक्त हे दलित बहुजन समाजातील असताना त्यांना देवाचा 'पुजारी' म्हणून किंवा त्या देवस्थानचा/ ट्रस्टचा 'अध्यक्ष' बनण्याचा अधिकार मात्र नाही. हीच बोंब सध्या अयोध्येत शिलान्यास झालेल्या राममंदिराच्या बाबतीत देखील आहे. दलित बहुजन समाजाची दक्षिणा मोठ्या मिटक्या मारत स्वीकारणाऱ्या देवस्थान आणि ट्रस्टसाठी अशा निर्णायक वेळी बहुजन समाज हा हिंदू नसून अचानक 'शूद्र' बनतो. ह्याचा विचार बहुजन आणि विशेषतः ओबीसी समाज करणार आहे की नाही? हिंदू बहुजन समाज आपला धर्म हा 'सनातन' आहे, त्याला कोणताही आरंभ नाही आणि कोणताही अंत नाही अशी मल्लिनाथी करतो. अशा हिंदू धर्मातील शिव शंकर हा देव 'अनादी अनंत' आहे असा दावा हिंदू बहुजन समाज करतो. मग अशा शिव शंकराच्या मुलाच्या म्हणजेच गणेशाच्या गळ्यामध्ये प्रतिष्ठापनेच्या समयी 'जानवं' का म्हणून घातले जाते? शिव शंकर हा देव जातीने ब्राह्मण होता का? असेल तर पुरावा काय? गणेश पूजेमध्ये 'सत्यनारायणाच्या' पूजेचा संबंध काय? हे कळीचे प्रश्न बहुजन समाज स्वतःच्या मनाला विचारणार आहे की नाही? असे श्रद्धेच्या नावाखाली बहुजन समाज 'ब्राह्मणी धर्मवर्चस्वाला' अजून किती दिवस आंधळ्या पद्धतीने पूजत बसणार आहे? ह्याचा विचार प्रत्येक बहुजन तरुणाने करावा.

बहुजन समाजातील प्रौढ आणि म्हाताऱ्या माणसांच्या रक्तामध्ये धार्मिक आणि मानसिक गुलामी पूर्णपणे भिनली आहे. त्यांचा स्वाभिमान हा धर्मांध होऊन मातीमोल झाला आहे. ते अशा महत्वाच्या समस्येला परखडपणे तोंड देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे हा वैचारिक संघर्ष आता बहुजन तरुणांनाच करावा लागणार आहे.


पुण्यातील सोन्याने मढवलेले 'श्रीमंत' गणपती आणि मुंबईतील मोठ-मोठ्या गणेश मंडळांकडे/ ट्रस्टकडे असलेली संपत्ती आणि पैसे पाहून बहुजन समाजाचे डोळे दिपून जातात. परंतु बहुजन समाज हे विसरतो की हे सर्व वैभव आणि संपत्ती त्यांच्याच पैशातून उभे राहिले आहे. देवाच्या नावावर जमवलेली ही संपत्ती बहुजन समाजाची धार्मिक आणि मानसिक गुलामगिरी आणि त्याची पिढ्यानपिढ्या होत असलेली अवहेलना दर्शवते. जेव्हा अशा गणेश मंडळ, देवस्थान ट्रस्ट ह्यांच्याकडे असलेल्या अमाप संपत्तीबद्दल विचारणा केली जाते तेव्हा 'ह्याच संपत्तीमधून आम्ही समाज उपयोगी काम देखील करतो' असा फुटकळ युक्तिवाद करून असे मंडळ, देवस्थान ट्रस्ट वेळ मारून नेतात. खरे तर बहुजनांचा हिंदू धर्मावरील हक्क नाकारून त्यांच्या 'तोंडाला लोणी चोपून पोटभरून जेवण जेवल्याचा' हा जो काही देखावा केला जातो ह्याला बहुजन समाज फसतो. सत्य परिस्थिती अशी आहे की अशा 'धंदेवाईक गणेश मंडळ आणि ट्रस्ट' मध्ये भक्तांच्या देवदर्शनाच्या लाईन सुद्धा 'VIP' असतात जिथे सेलिब्रिटी, मोठे उद्योगपती, राजकारणी ह्यांना गणपतीचे 'स्पेशल दर्शन' आणि 'स्पेशल पूजा' करून दिली जाते आणि सामान्य माणसाला ढकलाढकली करून 'पुढे सरका' असे म्हणून झिडकारले जाते. जर गणपती सारखा देव हा शेतकरी, कामगार अशा सामान्य माणसांचा देव असेल तर मग देवाच्या दरबारात हा भेदभाव का? असे हे धर्माच्या नावाखाली संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन आणि अहंकार अभिमानाची गोष्ट नसून दलित बहुजन समाजाच्या धार्मिक आणि मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे.


सर्वसामान्य हिंदू दलित बहुजन समाज गणेशाला 'बुद्धीचा देवता' मानतो. ह्या गणेश चतुर्थीमध्ये मी अशी कामना करतो की ज्या देवाला बहुजन समाज बुद्धीची देवता मानतो त्याचा आदर्श घेऊन बहुजन समाज हे महत्वाचे प्रश्न विचारण्याची बुद्धी आणि हिम्मत आपल्या मेंदूत आणि काळजात तयार करेल.लेखक आनंद क्षीरसागर ह्यांनी फर्ग्युसन कॉलेज, पुणे इथून 'मायक्रोबायोलॉजी' आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई इथून 'डेव्हलपमेंट स्टडीस' मध्ये पदवीयुत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या ते नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी बंगळुरू मधून 'मानव अधिकार कायदयाचे' शिक्षण घेत आहेत. तसेच ते नाट्य आणि हिप-हॉप कलाकार देखील आहेत.


#BAHUJANSPEAKS #BAHUJANYOUTH #BAHUJAN

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn