ज्यूस : पुरुष सत्ताक व्यवस्थेला जोरदार चपराक !

-कबीर उषा लक्ष्मण बोबडे
सामाजिक विषमता हि जात, धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पूर्वीपेक्षा महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे, असं बोलल्या जातेय. परंतु हा बदल होत असताना असे जाणवते कि, खरच हा बदल होतो आहे का? कारण आपण प्रत्येकजण म्हणतो कि, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण खरे पाहिले असता पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र महिलांना दुय्यमच स्थान आजही दिले जात असलेले दिसून येते. महिलांना आजच्या युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुष समानता हा वादाचाच मुद्दा राहिलेला आहे; स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. सतीप्रथा, हुंडाप्रथा, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीतिनी लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले. भारतात ब्रिटीशांचे आगमन होईपर्यंत या निर्दयी प्रथा देशात चालूच होत्या. ब्रिटीशकाळात जोतीबा फुले आणि सावित्रीमाई, राजा राममोहन रोय यासारख्या भारतीय समाजसुधारकांची स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ आणि ब्रिटीशांचा स्त्री विषयक पाश्चात्य दृष्टीकोन यामुळे ब्रिटीशांंनी अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले. गेल्या शतकात स्त्री हक्कांबाबत झालेल्या चळवळीमुळे पुरुष सत्ताक व्यवस्थेला हादरे बसले. मात्र, आज परिस्थिती बदलते आहे, असे बरेच लोक म्हणताना दिसतात. तसे ते खरेही असेल मात्र या संदर्भात आमूलाग्र परिवर्तन ज्या पद्धतीने, ज्या दिशेने व्हायला हवे तसे ते होताना दिसत नाही. आपल्याला आजही वर्तमानपत्रात, न्यूज चॅनेल्सवर स्त्रियांवर होणाऱ्या जुलमाविषयी, अन्याय अत्याचाराविषयी वरचेवर ऐकायला, वाचायला व पाहायलाही मिळते. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता अजूनही लोकांच्या मनात घट्ट रुजलेली आहे. त्यामुळे स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे यासह त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याचे देखील अधिकार नाकारण्यात आले होते. जुन्या धार्मिक कायद्यांचा - पारंपरिक गोष्टीचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेलेली दिसतात.   केवळ चार भितींच्या बाहेरच नाही, तर चार भिंतीच्या आतही स्त्रियांचं अतोनात शोषण होतं.. फक्त त्याचा आवाज आपल्या पर्यंत पोहोचत नाही, इतकाच काय तो फरक ! चार भिंतीच्या आत वावरणाऱ्या, चूल आणि मूल इतकंच अवकाश असणाऱ्या स्त्रियांचा आवाज आपल्या पर्यंत पोहोचवण्याचं काम  राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक निरज घायवान यांनी ‘ज्यूस’  या लघुपटातून केलं. या लघुपटातून समाजात खोलवर रुजलेल्या समज व प्रथांवर एका उन्हाळ्यातल्या संध्याकाळी प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. स्त्रियांच्या पारंपरिक व कौटुंबिक श्रमावर भाष्य करणारा 'ज्यूस' हा लघुपट असून यात सार्वजनिक अवकाशातील पितृसत्ताक राजकारणासह, स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि दमनशाही पद्धतीचे कौटुंबिक वातावरण यावर भाष्य केलं आहे.


ज्यूस' ही कथा आहे मंजू सिंग (शेफाली शहा) आणि ब्रिजेश सिंग (मनिष चौधरी) ह्यांच्या घरातील.  अशाच एका संध्याकाळी मंजू आणि तिच्या नवऱ्याने  एक फॅमिली गेट टू गेदर ठेवलं आहे. काही जवळचे मित्र त्यांच्या परिवारासह पार्टीला आले आहेत. पाच जोडपे आणि एक घरकाम करणारी महिला, अशी एकूण अकरा स्टारकास्ट आहेत.  चार पुरुष हॉलमध्ये बसून दारु, त्यासोबत चिकनवर ताव मारत गप्पा चालल्यात, सम्राट अकबरापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत अनेक विषयांवर प्रचंड आत्मविश्वासाने चर्चा करताहेत, मतं मांडताहेत, वाद घालताहेत. मधेच 'फिमेल’ बॉसबद्दलच्या असंतोषाला वेगळ्याच सबबींखाली वाट करून देताहेत. आणि स्त्रीया किचनमधे स्पयंपाक बनवत आहेत. मध्येच काही लागले तर किचनमध्ये काम करत असलेल्या मंजूला हाक मारतात. मुलं दुसर्‍या रुममध्ये खेळतायत. पुरूषांच्या गप्पा नवीन स्त्री बॉसवर घसरतात (मंजूला 'डोन्ट माईंड' सांगून), त्यात थोडी बंगाली, सन्याल बाबूंच्या उच्चारांची थट्टा होते आणि मग अमेरिकन राजकारणावर, ट्रंपवर घसरतात. काही वेळाने नव्यानेच लग्न झालेलं जोडपे येतं. तो पुरुषही आधीच्या पुरुषांमध्ये दारुच्या पंगतीत बसतो आणि बायकोला मंजू सोबत किचनमध्ये धाडतो. आपल्या बायकोला काही नवीन पदार्थ शिकवण्याची मंजूला विनंती करतो. पुरुषमंडळी बाहेर कूलरसमोर बसून राजकारणावर आणि इतर विषयांवर शिळोप्याच्या गप्पा मारीत असताना स्त्रिया मात्र किचनमधल्या उकाडय़ात पंख्याशिवाय राबत जेवण बनविण्यात मग्न आहे. स्वयंपाकाची लगबग चालू आहे, कबाब, घुगनी बनतात आहे, बाहेर पुरुषांची सरबराई करण्यासाठी. मुलं व्हिडिओ गेममध्ये मग्न आहेत. मंजू कुलरमध्ये पाणी भरून दिवाणखाण्यात ठेवते, उकाडा फार वाढलाय. किचनमध्ये तर उकाडा खूपच जाणवतोय, पण तिथे पंखा नाही. मंजू स्टुलावर चढून एक जूना टेबलफॅन काढते (तिची धडपड टिपणारा कॅमेराचा टॉप अँगल लक्षात राहतो. त्यातला सूचक अर्थ कुठेतरी नेणीवेत घट्ट रुतून बसतो) पण तो थोडा चालू होऊन बंद पडतो. मंजू नवर्‍याला, ब्रिजेशला पंख्याकडे बघायला सांगते, तो 'आ रहे है' म्हणतो, पण गप्पांमध्येच रंगून जातो. आता पुरुषांच्या गप्पा आता 'पेचीस', अकबरावर घसरल्यात. सरबराई सुरूच आहे.सगळ्यांच्या गप्पाही अर्थातच टिपिकल 'बायकी' विषयांभोवती फिरणाऱ्या. स्त्रियांच्या गप्पा गरोदर असणार्‍या रजनीच्या 'ग्लो' विषयी आणि मुलांविषयी.

एक प्रेग्नंट आहे. तिला नवऱ्याने मूल झाल्यावर नोकरी सोड असा आदेश दिलाय. (सध्या प्रेग्नंसी च्या रजेवर असताना रेसिपीज शिकतेय). दुसरीला आता तू नंबर लाव असा सल्ला बाकीच्या देताहेत. जेवायची वेळ झाल्यानंतर छोट्या डॉलीची आई, सरला तिला सगळ्या भैयांसाठी खाणे घेऊन जायला सांगते. सरला डॉलीला म्हणते,  'खेलना बंद करो और भय्या लोगों को खाना खिलाव’. तिच्या तोंडाच्या या संवादातून  मुलगा आणि मुलगी असा फरक प्रकर्षाने जाणवतो. अंकललोग बात करत रहे हो, तो वहाँ नही जाते. हमें देखा है कभी जाते हुए' (म्हणजे बालकं आणि स्त्रियांची कॅटेगरी एक) असं मुलांना दटावणारी एक बाईही त्यांच्यातच असते. घरातली बाई सगळ्या आघाड्यांवर लढतेय, त्यात गॅसवर ठेवलेलं चिकन लागलंय, ते वाचवण्याचा प्रयत्न करतेय, एकीकडे उकाडा मी म्हणतोय, मदतनीस बाई आता गेलेली आहे, नवरा अधूनमधून 'हे आण, ते आण'च्या ऑर्डर्स सोडतोय, बसल्या जागेवरून लावलाय. मध्येच मंजूचा नवरा जेवण वाढायला सांगतो, या सगळ्याचा त्रासलेली मंजूच्या संतापाचा एका क्षणी उद्रेक होतो, ती फ्रीजमधून ज्यूसची बाटली काढते. ज्यूस ग्लासात भरते.  हाताने किचनमधूनच एक खुर्ची सरकवत हॉलमध्ये आणते. बाहेर पुरुषांमध्ये कुलरच्या बाजूला बसते मंजूची आणि तिच्या नवऱ्याची नजरानजर होते.  आणि थंड हवा घेत ज्यूस पिते. काही सेकंद डोळे मिटते, त्यावेळी सगळेजण अवाक होऊन तिच्याकडे पाहत बसतात. मंजू डोळे उघडते, त्यावेळी तिच्या डोळ्यात आसवांनी भरलेली भयंकर चमक जाणवते, ती पाहून समोरील सगळे पुरुष खाली मान घालतात. मंजू पुन्हा एकदा ज्यूस पिते आणि फिल्म संपते.


स्त्रियांचा उपयोग  फक्त ‘चूल आणि मूल’ सांभाळण्यासाठी आहे असे गृहीत धरणाऱ्यांवर हा लघुपट कठोर प्रहार करतो.  ज्यूस’ हा लघुपट स्त्री-पुरुष विषमतेवर एका छोटय़ाशा प्रसंगातून नेमकं भाष्य करतो.  शिवाय, किचनमध्ये स्वयंपाक चालू असतांना उकाड्याने बायका हैराण झाल्यात, चहा घेतायत. मंजू गरोदर रजनीला कामवाल्या पर्बतियासाठी एक कप द्यायला सांगते, धड कप दिसत असतांनाही रजनी एक तुटका स्टीलचा छोटा ग्लास सरकवते. "उशीर झालाय, जाते आता" असे सांगून दुखावलेली पर्बतिया चहा टाळते. 

महिला आणि वर्चस्ववादी पुरुष हा संघर्ष दाखवताना, महिला विरुद्ध महिला हा संघर्षदेखील या लघुपटात दिग्दर्शकाने मांडला. 

शेतीचा शोध हा मानवीजीवनातील - मानवी इतिहासातील खुप महत्वाचा  क्रांतिकारक शोध आहे. शेतीचा शोध लागल्यामुळे भटकत राहणाऱ्या माणसाचे जगणे  स्थिर झाले. माणूस शेतीला आणि मातृदेवतेला मानू लागला. मातील जशी सृजनाची ताकत आहे, तशाच स्त्रीकडेही बीजधारणेचा गुण असल्यामुळे तिलाही आदिशक्ती मानून तिच्या मूर्ती बनवून तिला मखरात बसवून तिची पूजा केली जाऊ लागली. हे सगळं होत होतं ते मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत. मात्र नंतर  कालांतराने मातृसत्ताक व्यवस्था नष्ट होऊन पुरुषसत्ताक व्यवस्था वाढत गेली आणि एकेकाळी ज्या स्त्री ची पूजा व्हायची, आता  तिचा छळ व्हायला सुरुवात झाली. तरीही स्त्री  चुल आणि मूल नेटाने सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. स्त्री सर्व आघाड्यांवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे, असे असले, तरी पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता अद्याप बदललेली नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे, पितृसत्ताक

कौटुंबिक व्यवस्थेत वाढलेल्या स्त्री-पुरुषांच्या मनावर झालेले संस्कार ! अमुक - तमुक प्रकारचं वागणं म्हणजे आदर्श वागणं, आदर्श स्त्री होणं हे नाना तऱ्हेचे संस्कार मनावर बिबवल्या गेल्या मुळे केवळ पुरुष वर्गच पुरुषसत्तेचा मानसिक गुलाम आहे असे नाही, तर स्त्रिया देखील या पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या गुलाम आहेत.  


स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेत काही फरक आहेत. मात्र; हा नैसर्गिक फरक बाजूला ठेवला तर दुसरा कुठला भेद स्त्री - पुरुष यांच्यात निसर्गाने केला नाही. जे भेदा भेद आपल्याला दिसतात, ते सगळे भेद हे पुरुष सत्ताक व्यवस्थेने निर्माण केले. स्त्री कुठलीही असो, ती पुरुष सत्ताक व्यवस्थेची गुलामच आहे, हे दाहक समाजवास्तव आहे, फक्त त्याची तीव्रता कमी अधिक असते. मात्र, पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या पहिल्या बळी ठरतात, त्या घरगुती बाई स्त्रीया. अशा हाऊसवाईफ ला पुरुषांकडून हीन, गुलामीची वागणूक दिली जाते. तिचा जन्म केवळ घरातल्या कामांसाठीच झालाय, अस समजून मोलकरणीसारखी वागणूक तिला मिळते. भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे. स्त्री व पुरुष दोघांनाही भूक लागते. मग जेवण बनवण्याची जबाबदारी स्त्रीवरच का?  पुरुषसत्ताक समाजाने  पिढ्यानपिढ्या ही जबाबदारी महिलेवर लादली. आज पर्यंत आपण याला आपली संस्कृती समजत होतो. पण ही आहे अर्ध्या समाजाच्या श्रमाची लूट उरलेल्या अर्ध्या समाजाकडून. पुरुषसत्ता ही फक्त मानसिक नाही ही स्त्रीच्या श्रमाच्या लुटीवर आधारलेली व्यवस्था आहे. हे या लघुपटातून अचूक अधोरेखित कले.  महिलांना रोजच्या जगण्यात कसे दुय्यम स्थान आहे, हे या लघुपटातून  दाखवून रोजच्या जगण्यातली विषमता, लिंगभेद (gender roles) या शोषणकारी पितृसत्ताक व्यवस्थेच्या मूल्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. लग्नानंतर नवऱ्याच्या सांगण्यावरून नोकरी सोडून घरची कामं आणि मुलांची जबाबदारी पार पाडत असताना मंजूची होणारी घुसमट या शॉर्टफिल्ममध्ये अप्रतिम पद्धतीनं मांडली आहे. स्त्रीला देण्यात येणाऱ्या दुय्यम स्थानाची नेमकी स्थिती या लघुपटातून  मांडून पुरुष सत्ताक संस्कृतीचे नागड रूप दाखवलं. 

मसान सिनेमामुळे निरज घेवनबद्दल आदरही वाढला आहे आणि अपेक्षाही.  शॉर्ट फिल्मच्या दिग्दर्शन आणि लेखन निरज घायवन यांनीच केले असून नेमकेपणाने लिहिलेले संवाद भारतीय पुरुषसत्ताक व्यवस्तथे मधील वास्तव मांडतात. यातील फ्रेम्स  अत्यंत प्रभावी आहेत. संवाद आणि दृश्य यांच्या माध्यमातून नेमका मेसेज दिग्दर्शकाने पोहोचवला आहे. लघुपटाची कथा बहूपदरी असून यात सामाजिक उतरंडीचे छोटे प्रसंग, मुलांवर नकळत होणारे बरे-वाईट संस्कार, स्त्रियांचा छळवाद असे प्रसंग कथेत सुरेखपणे विणले.

ही शॉर्ट फिल्म केवळ १४ मिनिटांची असून 

 लाईन्स, टायटल आणि शेवटच्या क्रेडिट लाईन्स याला साधारणतः १ मिनिटं वेळ गेला तर हा लघुपट केवळ  १३ मिनिटांचा. मात्र ही १३ मिनिटे सुद्धा अत्यंत प्रभावी आणि क्लास पद्धतीने वापरली आहेत. जे सांगायचंय ते अत्यंत नेमक्या दृश्यात मांडलंय आणि गरज भासेल तिथेच संवादाचा वापर आहे. इतक्या कमी कालावधीत नीरजने केवढ्या तरी मोठ्या, खोल आणि गंभीर विषयावर प्रभावी भाष्य केले आहे. तेही अत्यंत जबाबदारीने आणि सृजनशीलतेचा यथायोग्य वापर करुन. 

मंजू हे या लघुपटातील महत्वाचे पात्र असून ती आणि पुरूषसत्ताक व्यवस्थेचा पाईक असलेला तिचा नवरा मनीषमुळे होत जाणती घुसमट दिग्दर्शक मांडतो. पुरुष सत्ताक व्यवस्थे विरुद्धचा मंजू चा संघर्ष एका टोकाला गेल्यानंतर तिचं ज्यूस पिणे हे कथानकातील प्रचंड महत्वाची घटना आहे. त्यामुळे कौटुंबिक वातावरणात आणि स्त्री-पुरुषांतील वर्चस्ववादी नातेसंबंध या दोन्ही बाबी दृश्य पातळीवर समोर येतात. 

सगळ्याच कलाकाराचा अभिनय उत्तम असून शेफानी शहाने साकारलेली मंजू लक्षात राहते. शफाली खान ने साकारलेल्या भूमिकेमुळे  तिच्या अभिनयाचे कसब दिसून येते. लेखक-दिग्दर्शक घायवन यांच्यापासून पासून ते त्या त्या विभागातील काम करणाऱ्या सगळ्याच कलाकार - तंत्रज्ञाचे काम प्रभावी झालेलं दिसतं. 

या पितृसत्ताक व्यवस्थेने महिलांवर प्रचंड बंधनं घातलेली आहेत. मोठ्याने हसायचे नाही, पाय फाकवून बसायचं नाही, ओढणी व्यवस्थित छातीवर असली पाहिजे, रस्त्यावरून जाताना खाली मान घालून जावे, आणि काय नी काय.. अशी कित्येक बंधनं या पितृसत्ताक व्यवस्थेने घातलेली आहेत. आणि या बंधनांना संस्कारच गोंडस नाव दिल. समाजाचे हे विषमतेचे व्याकरण मोडून म्हणून  पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान दिलं जाऊ शकतं, या विश्वास हा लघुपट निर्माण करतो. 

मंजू जेव्हा हॉल मध्ये येईन सर्वांपुढे ज्यूस पिते, हे दृश्य पुरुष सत्ताक व्यवस्थेचे कानफटात मारलेली चपराक आहे. लघुपटातील पुरुष पात्रांच्या जशा नजरा खाली जातात, तशा आपल्याला देखील नजरा खाली जातात. हा लघुपट विचारप्रवृत्त करतो..... शेवटचं दृश्य पाहताना निर्मला पुतील यांची कविता आठवते- 

तन के भूगोल से परे

एक स्त्री के

मन की गांठे खोलकर 

कभी पढ़ा है तुमने

उसके भीतर का

खौलता इतिहास !

-कबीर उषा लक्ष्मण बोबडे

पत्रकार - शॉर्टफिल्म मेकर

 SUpport

Independent Journalism

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved