- वनश्री वनकर

सकाळी 10 ची वेळ असेल, थंडीच्या दिवसात कोवळी ऊन पडली होती. बहुदा मुंबईत कामाचे तास केव्हाच सुरु झाले होते. लोकं ह्या धगधगत्या मायानागरीत प्रचंड वेगाने पळत होते. पायांची गती एवढी असते कि डोळ्यांना कुणाचं दुःख टिपूच देत नाहीत आणि कुणाची किंचाळी ऐकण्यासाठी कान मोकळे नसतात, त्यात हेडफोन टाकून एक मर्यादित विश्व तयार केलेलं असत लोकांनी. डोळ्यासमोर दिसणारी प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या दिशेनं पळत होती. पण त्यात डोळ्यांना बोचणारं एक दृश्य दिसलं. डोळ्यांना ते स्थिर चित्र खलत होत. एक 30-35 वर्षाची, सावळी शी, शेंगेसारखी सडपातळ आणि आजाराने कमजोर झालेली स्त्री. ती अरोरा टॉकीजच्या बाहेर रस्त्याच्या एका कड्याला अंथरुणावर बसलेली होती. जरा चिडलेली आणि स्वतःशी काही तरी पुटपुटत होती. तिच्या चुरगळलेल्या, मळक्या गाठोड्यात काहीतरी शोधात होती. ठिगळं लागलेलं स्वेटर, शॉल, एक दोन सामान भरलेले पुडके, एक मळकं पांघरून, कधीही न धुतलेलं. एका कागदात सकाळचा अर्धा वडापाव जपून ठेवलेला होता. हा एवढाच तिचा संसार होता. 3 दिवसांआधीच तिला दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. तिच्या मेडिकल रिपोर्ट ची भलीमोठी फाईल आणि गोळ्यांचे ढिगारे तिच्या उशाशी पडलेले होते. तिला जाणनारे 5-6 लोक तिच्या भवताली उभे राहून तिला काही तरी समजावत होते, पण ही कुणाही कडे लक्ष देत नव्हती. सारखं तिच्या डोळ्यात पाणी येत होत आणि ती रागानं डोळे पुसत होती. आम्ही जवळ जाऊन बघितलं तेव्हा कळालं ती आश्रमात जाऊन राहण्यास नकार देत होती. तिला रस्त्यावरच राहायचं होत
सकाळीं.
ती जन्मापासूनच बेघर, अक्ख आयुष्य मुंबईच्या रस्त्यांवर गेलं. आई फार कमी वयात वारली आणि बापानं दुसरं लग्न केलं. सावत्र आई नीट बघत नाही म्हणून ती आणि तिची मोठी बहीण व एक भाऊ वेगळे राहु लागले. मध्यंतरी तिच्या मोठ्या बहिणीनं आत्महत्या केली, त्यांनतर ती फारच खचली, असे लोक सांगतात. भाऊ आहे पण नसल्यागतच. तीनं हि लग्न केलं, मात्र त्याच्याशी हि तिचं पटलं नाही कदाचित. म्हणून फार कमी वयात तिनं दारू प्यायला सुरवात केली. व्यसनाच्या इतकी आधीन की लिव्हर फेल पडलय. डॉक्टरांनी हि हात वर केलेत. किती दिवस जगेल हे काही सांगता येत नाही. औषधांवर जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. ती आयुष्यातले शेवटचे क्षण मोजत आहे. ती आणखी काही दिवस जगावी म्हणून संस्थेचे लोक धडपड करीत होते. तिची समजूत काढत होते. पण ती कुणाचही ऐकायला तयार नव्हती. तिच्या शरीराचा सापळा दिसायला लागला होता. पोट मात्र फुगत चाललेलं. डॉक्टरांनी दिवसभरात केवळ अर्धा लिटर पाणी प्यायला सांगितलं. तिला होणारा त्रास आता कुणालाच बघवत नव्हता. तिच्या उपचारासाठी संस्थेने तिला काही पैसे दिले होते, ते हि तिचा भाऊ घेऊन गेला, आणि परतलाच नाही. तिची परिस्थिती खालावत चालली होती. ह्या शारीरिक त्रासामुळे तिची मानसिक स्थिती ही ढासळत होती. तिची चिडचिड प्रचंड वाढली होती. मधेच रडणं हि सुरु करायची. नशिबाला, समाजाला आणि कुटुंबाला शिवीगाळ करायची.
त्यामुळे सगळ्यांनी तिला काही वेळासाठी एकटं सोडण्याचा निर्णय घेतला. सगळे जण आपापल्या कामाला लागले. ती काहीवेळ झोपेल ह्या आशेने सगळे निघून गेले. आम्ही ही रोजच्या कामाला लागलो. पण आज मात्र आमचं तिच्यावर लक्ष होतं. ती बसूनच होती आणि रागात काहीतरी पुटपुटत होती. एक माणूस बऱ्याच वेळा पासून हा प्रकार बघत होता. मळकेच कपडे पण टापटीप दिसत होता, चामड्याचा बूट, रफु केलेली जीन्स ची पॅन्ट, त्यावर बेल्ट, कुठल्यातरी हिरोला बघून मापून केलेली हेअरस्टाईल असा सगळा त्याचा रुबाब होता. कुठे तरी छोट मोठं काम करत असावा. पण ह्याआधी आम्ही त्याला कधीही बघितलं नव्हतं. सगळे लोकं गेल्यावर तो तिच्या जवळ गेला आणि एक पुडका दिला, कदाचित काहीतरी खायला आणलं असावं त्याने, पण तिने तो फेकून दिला. त्याने तो परत उचलला आणि तिच्या जवळ नेऊन दिला आणि तिने तो परत फेकला. ती भयंकर रागात होती आणि तो शांततेने तिला काहीतरी बोलत होता. आम्ही दुरून बघत होतो त्यामुळे नक्की काय संवाद चाललाय हे मात्र कळत नव्हतं. थोड्या वेळात तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि तिच्या कडे बघू लागला. ती ही त्याच्याकडे पाठ करून झोपून गेली. या प्रकारानंतर हे मात्र सिद्ध झालं की ते एकमेकांना ओळखत होते.
एक तास लोटून गेला, तो तिथेच बसून होता आणि हि मध्ये मध्ये त्याच्याकडे रागाने बघत होती. हे कुठवर चालणार म्हणून आम्ही मध्यस्थी घेण्याचं ठरवलं. तिच्या कडे गेलो आणि विचारलं, “ वो परेशान कर रहा है तुम्हे ?” तिने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्याकडे चोरून बघू लागली. तिला पुन्हा विचारलं “ये क्यू फेका..?” तिने रागात उत्तर दिलं , “नही चाहिये! बोल दो उसे जाने को”
आम्ही परत विचारलं , “कौन है ये?”, ती उत्तरली “मरद है मेरा !”
तिचं हे उत्तर ऐकून आम्ही अचंबित झालो. पुढे कळलं, ते दोघे 8 वर्षांपासून वेगळे राहतात, त्यांना 14 वर्षाची मुलगी आहे, तिला हॉस्टेल ला टाकलय. हा कॅटर्स मध्ये कामाला आहे. कोळीवाड्यात खोली करून राहतो. ह्यांचं एकमेकांशी तिळमात्रही पटत नाही, पण त्याला तिच्या तब्बेतीविषयी कळलं, तेव्हापासून तो सतत तिच्या मागं घिरट्या घालतोय, तो सकाळपासून तिथंच बसला होता. सकाळी तिला नाश्ता हि आणून दिला होता. पण तिनं तो फेकून दिला. त्यांच्यात झालेल्या मतभेदांचा राग अजूनही तिच्या मनात घर करून आहे. त्याच्या मनातही तेवढाच राग आहे, पण तरीही तो तिथेच बसलेला होता, तिला बघत. काहीही झालं तरी शेवटी ती त्याच्या लेकराची आई होती. ती वेदनेत आहे हे कळताच तो सगळे काम टाकून आला, ती बोलत नाही, बघत ही नाही, तरी ही बसलाय दिवसभर तिला बघत. कधीतरी भावनेच्या भरात त्यानेही ‘मरेपर्यंत साथ देण्याच्या’ आणाभाका घेतल्या असेलच ना ! तेच निभावत असावा कदाचित. तिने जरा कड जरी पालटली तरी तो ऊठून येऊन बघत असे. त्यालाही कळुन चुकलंय, ती आता जास्त दिवस जगणार नाही. आता पुढच्या वेळी भांडायला ती नसेल, तिचे रागाभारले शब्द हि आता मोजकेच दिवस ऐकायला येतील. शेवटच्या वेळी का असोना पण त्याला हवी होती ती, कदाचित !
त्या दोघांमध्ये काय बोलावं हे मात्र आम्हाला कळत नव्हतं. मागल्या 8 वर्षात कधी न फिरकलेला आज तिच्या समोर होता, ती चिडत होती, होत्या नव्हत्या सगळ्या शिव्या देत होती, आणि तो शांत चेहऱ्याने एकच वाक्य बोलत होता, “ घर चल, मै तेरा खयाल राखुंगा” !
ती आता आमच्याशी बोलणं टाळत होती. ह्यात हात घालण्याचा आमचा अधिकार नाही हे आम्हाला जाणवू लागल होतं. आम्ही हळुवार पाऊलं मागे घेतली. त्या दोघांतील शाब्दिक शांतता वाढत होती. पण नजर मात्र गदारोळ घालत होती. ती परत त्याच्याकडे पाठ करून निपचित पडली आणि तो परत जाऊन बसला त्याच्या जागी, मनभरून बघत बसला त्याच्या अर्धांगिनी ला , नेहमीसाठी सोडून जाण्याआधी..!
वाट बघत बसला तिच्या एका होकाराची..
तिला घरी घेऊन जाण्यासाठि..
शेवटचं!!!
लेखिका वनश्री वनकर यांनी मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत दलित आणि आदिवासी अभ्यास आणि कृती या विषयात एम ए पूर्ण केले आहे.