पावसाचा निबंध : एक अस्वस्थ करणारा पाऊस

वनश्री वनकरएखाद्या टेबलाबर जुगार चालावा आणि खेळ पूर्णपणे एकाच्या खिशात जाणार म्हणून आपण आशा सोडावी , तेवढ्यात गररर्कन फिरून कुणीतरी हुकूम चा एक्का टाकून अक्खा खेळ उलथुन पडावा आणि लुटून न्यावं सगळं एका क्षणात ...! असच काहीतरी होतं नागराज मंजूळेंचा चित्रपट बघतांना.


'पावसाचा निबंध ' ह्या लघुचित्रपटाने येऊन, इतर सर्व चर्चा मागील एक आठवड्यापासून ठप्प पडल्यात. मागील तीन वर्षांपासून नॅशनल सहित अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पुरस्कार खिशात घेऊन हा चित्रपट लोकांच्या अतुरतेच कारण बनला होता. त्यामुळे लॉकडाऊन च्या काळात हा लघुचित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे प्रेक्षकांना, अभ्यासकांना मेजवानी ठरली. 'आटपाट ' च्या कथा म्हणजे आरसा दाखवून विचार करायला लावणाऱ्या, तुमच्या माझ्या आयुष्यातल्या प्रसंगांच, भावनिक गोंधळाच प्रतिबिंब असतात. पण त्या पलीकडे जाऊन तांत्रिक बाजू अप्रतिम व सर्वोत्तम असते, ह्यात दुजोरा नाही.


अगदी सुरवाती पासून असलेला मुसळधार पावसाचा आवाज मनाला सतत भिजवत असतो आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं अविनाश सोनवणे ह्यांना. त्यांना ह्यासाठी नॅशनल मिळालाय, ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. सिनेमॅटोग्राफर, सुधाकर रेड्डी ह्यांच्या अप्रतिम कामाची अनुभूती मंजुळेच्या जवळपास सर्वच चित्रपटात बघायला मिळलीये. त्यावर ललित खाचने ह्याची VFX ची कामगिरी ही वाखण्या जोगी आहे. 'कास्टिंग ' , अतिशय वास्तववादी, अचूक आणि अपर्यायी. एकंदरीत तांत्रिक बाबींच्या सर्वच दृष्टिकोनातून पावसाचा निबंध हा परिपूर्ण आहेच, हे नाकारता येत नाही.


पण , नागराज मंजुळे ओळखले जातात ते त्यांच्या वास्तववादी कथांसाठी, ज्यात समाजव्यवस्था, जाती, लिंग ह्यांची दृश्य-अदृश्य समीकरण भिन्न अंगातून मांडली असतात, त्याच बरोबर Symbolic Interaction ( प्रतिकात्मक सुसंवाद) हा त्यांच्या दिग्दर्शन शैलीचा महत्वाचा भाग आहे, आणि ह्या हि कथेने सरळ लोकांच्या हृदयात हात घातलाय.


शाळेत दिलेल्या पावसावर निबंध लिहिण्याच्या गृहपाठाने कथेची सुरवात होते.पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात किती वेगवेगळे पैलू घेऊन येऊ शकतो, ह्याची मनाला चटका देणारी ही कथा आहे. संपूर्ण चित्रपट हा फिरत असतो तो राजा (मेघराज शिंदे) ह्या गोंडस मुला भोवती ज्यात तीव्र इच्छा असते तो निबंध लिहिण्याची मात्र घरातील बेताच्या परिस्थिती मुळे व मुसळधार पावसाने घरावर आलेल्या संकटामुळे अपुरा राहिलेला निबंध त्याला शिक्षेस पात्र ठरवतो, तेव्हा आपण नकळत प्रश्न विचारतो आपल्या शिक्षण पद्धतीला. साहजिकच, आपण चित्रपट बघताना त्या मुलाच्या जागी स्वतःला ठेवतो आणि संबंध बांधतो त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर. पण त्या बरोबरच वर्गातील इतर विशेषाधिकार (प्रिव्हिलेज) मिळालेली मुलंही आपल्याला आपल्या सारखीच वाटू शकतात. कुठेना कुठे, हीच ह्या पात्रांची कमाल आहे. राजाची आई (गार्गी कुलकर्णी) हे सक्षम आणि कष्टकरू पात्र, स्त्रीवादाचं विलक्षण उदाहरण आहे, दारुड्या बाप (शेषराज मंजुळे) , लहान बहीण (राही मंजुळे) ह्यांच्यवर मांडलेले प्रसंग हे आपल्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबव्यवस्थेचे प्रतिबिंब आहेत.कथेत, मुलाचे पात्र विलक्षण गोंडस, समजूतदार, चंठ, आणि प्रामाणिक दाखविलेले आहे. मधेच फॉरेनर्स ला इंग्रजीत रस्ता दाखणारा सीन त्याची अभ्यासातील प्रामाणिकता दाखवते. प्लास्टिकच्या पिशवीत पुस्तकं गुंडाळण्याची पद्धत त्याची पुस्तकांवरची निष्ठा दाखवते.


मुसळधार, संततधार पावसामुळे जिथे काही लोक रोमांचित झालेल्या वातावरणाचा आस्वाद घेतात तिथेच एखाद्याच्या आयुष्यात हा पाऊस ना ना अडचणीनी भरलेलं संकट घेऊन आदळतो.


वर्गातील सर्व मुले पावसावर त्यांच्या परीने पावसाचे सुखद, नयनरम्य, विनोदी वर्णन करतात. राजाच्या गुरं खेचताना, चिखलात घसरून पडणं, एखाद्यासाठी पावसाळ्यातले विनोदी दृश्य ठरू शकते पण तोच प्रसंग राजासाठी मात्र किती वेदनादाई असू शकतो, ह्याची कल्पना प्रेक्षक बांधू लागतो. शेवटी, अपूर्ण राहतो तो राजाचा गृहपाठ आणि राजा वर्ग शिक्षकाच्या शिक्षेस पात्र ठरतो, शिक्षेचा सीन हा क्लायमॅक्स ठरतो आणि ती शेवटची फ्रेम ही ह्या देशाच्या विचारसरणी, इतिहास, शिकवण, समाज व्यवस्था, पर्यायी शिक्षण व्यवस्था आणि त्याच बरोबर येथील राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. शेवटच्या फ्रेम मधील वर्गाबाहेर शिक्षा भोगणार मुलगा असतो, इकडे वर्गाच्या दारावर सावरकरांचा फोटो आणि वर्गातील शिक्षक हे एकाच विचारसरणीचे वाटू लागतात, कारण गृहपाठ देताना शिक्षकांचे उच्चार, " जर एवढ्या निसर्ग सौंदर्याची खान असेलेल्या भूमी मध्ये आपण जन्मलो आहोत आणि जर आपण पावसावर निबंध लिहिला नाही तर हा या निसर्ग सौंदर्याचा अपमान आहे आणि आपल्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि उपयोग ही नाही," हे वाक्य हि येथील समाजव्यवस्थेच्या क्रूरतेचं व असंवेदनशीलतेचं दर्शन घडवतं. फ्रेम दूर होत जाते तेव्हा शेवटच्या काही सेकंदात शाळेच्या कडेला दिसणारा बाबासाहेबांचा फोटो सहज सर्व प्रश्नांना सटीक उत्तरे देऊन जातो. बाबासाहेबही वर्गाबाहेर होते आणि राजा ही वर्गाबाहेर दिसतो, हे समीकरण सहज जुळुन येतं.आणि संपते कथा तिथेच, मनाला चिमटा घेऊन, स्वतःच्या जाती - वर्गा मध्ये वाटल्या गेलेल्या अस्थित्वाचा गुंता आपल्या हाती देऊन, कथा संपते.


Vanshree Vankar has completed her MA in Dalit and Tribal Studies and Action from Tata Institute of Social Sciences, Mumbai.


 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn