कविता , तश्या विद्रोहीच होत्याच तुझ्या ,
पोकळ समानता , प्रस्थापित सौंदर्य ह्याविरोधात तू मैफिली गाजवल्या कैकदा,
जाती व्यवस्थेच्या नावाखाली झालेल्या अमानुष कत्तली ,
भारतातल्या वर्गसंघर्षाचा बेवारस इतिहास ,
स्त्रीवादाच्या नवनवीन व्याख्या ,
सतत झळकत राहिल्या तुझ्या ह्या-त्या वह्यांच्या पानातुन ,
पहाटं पर्यंत गायलेली तुझी विद्रोहाची गितं ,
वरफड जायची ह्या अमानुष समाजव्यवस्थेला इतिहासासकट ,
तुझे रंग - कुंचले ना नटायचे भिंतीभिंतीतून क्रांतीची डरकाळी फोडत ,
पौलो , प्लेटो , अरिस्टोटल तर अशे समोर बसून गप्पा मारायचे तुझ्या लेखानातून ...!
व्वा ! वाटलं , हे जग निघालय समानतेच्या मार्गानं !
वाटलं ! बस्स आता जाती - लिंगाची सगळी सगळी भिताडं मोडून पडणारे सुंदर समाजाच्या स्वप्नपूर्ती साठी...!
म्हणून मी ही निघाले सैरावैरा दवंडी पिटवत ,
जाती अंताची - पितृसत्तेच्या लोपाची - प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरुद्ध...!
बेभान झाले स्वप्नात रंगवलेल्या त्या सम्यक विश्वात , जिथं पितृसत्तेला भेदत माणुसकी खळखळून वाहत होती..!
"उद्या समानतेची सकाळ होणारे" असे ओरडणार तेवढ्यात...!
अचानक सापडली तुझी 'प्रेमकविता' त्या मऊशार डायरीमध्ये ,
त्यात होती तू रंगवलेली ना ना प्रकारची गुलाबी स्वप्न ,
त्यात होते, गुलाबी ओठ , लांब केस , गोरे गाल , कमनीय बांधा , नाजूक हात , बोलके डोळे आणि बरच काही....!
तिथे सापडल्या नटी ,सौंदर्यवती अन् त्या सगळ्या अप्सरा , तुझ्या भविष्यात रमणाऱ्या...!
पण तुझ्या गाण्यांच्या मैफिलीत , कवितेत , गाण्यात लेखनात , वह्यात जिवंत केलेली काळी ओठं , विस्कटलेले केस , राब-राब राबून घामेजलेला सावळा रंग , उपसमारीचा झालेला सापळा, डोक्यावर मैला वाहुन दगड झालेले हात , अन्यायाविरुद्ध पेटलेले लाल डोळे , अस्स काही काही नव्हतं...! सावित्री-रमाई एवढंच काय तर प्रियांका , डेल्टा , झिशा,
पायल.. ह्यातलं ही कुणीच नव्हतं...!
म्हणून लगेच थबकले , आणि चाळून बघितली स्त्री दास्याची सगळी सगळी पुस्तकं , जी धुळीने माखली होती
उखरून काढु लागली स्त्रीमुक्तीच्या लढ्यांच्या कबरा ज्या बुजवल्या गेल्या होत्या , पुरोगामी पुरुषी ओझ्याखाली..
आणि तेव्हा उमगलं..
इतिहासापासून आजवर ... सतत गळचेपी झालीये इथल्या भेदक आवाजांची..
सतत , खुपसल्या गेलीयेत पाठीत खंजीर , स्वार्थासाठी - सत्तेसाठी..
मारून टाकल्यात कित्येक जनी पितृसत्त्येच्या डोहात..
असो , आता कळलंय..
ही रात्र वैराची आहे.. जाती - लिंगाच भयावह जंगलय...
आणि अत्याचारांच्या काचा पायात शिरल्याय..
पण , इतिहासाची शिदोरी , बाबा - क्रांतीबा घेतले आहेत उराशी.. सावित्री-रमाई च्या विचारांचा कंदील तेवत ठेवलंय सतत...
आणि सोबतीला मुक्ता , बहिना , तारा , नीना , मिशेल अश्या अनेक आहेत माझ्यासोबत...
म्हणून... उजेड दिसला तर समजा आम्ही आलोय , समानतेच्या स्वप्नपूर्तीसाठी..!
- Vanshree Vankar,