स्त्रीउन्नति चे पुरस्करते छत्रपति शाहू महाराज

By Vikas Kamble


'स्त्रीमुक्ती असावी पण त्यात माझी बायको, बहीण नसावी' अशीच काहीसी वर्तणूक आजही महिला मुक्तीचे गोडवे गाणाऱ्या अनेकांची असते, हे आपण आजही पाहतोय, अनुभवतो. यात स्त्री पुरुष दोघांचाही समावेश आहे. पण वारसा हक्काने मिळालेलं राज्य, जन्माने मिळालेलं उच्च जातीयत्व पुरुषत्व, ऐश्वर्य जवळ असतानाही माझा शाहू राजा या असल्या फडतुस विचारांना अजिबात जागा देत न्हवता. माझ्या राजाने 'स्त्री मुक्ती असावी आणि त्यात माझी बायको, बहीणच नाही तर माझी सुनही असावी' हा विचार स्वतः जगला.


'स्त्रीमुक्ती असावी पण त्यात माझी बायको, बहीण नसावी' अशीच काहीसी वर्तणूक आजही महिला मुक्तीचे गोडवे गाणाऱ्या अनेकांची असते, हे आपण आजही पाहतोय, अनुभवतो. यात स्त्री पुरुष दोघांचाही समावेश आहे. पण वारसा हक्काने मिळालेलं राज्य, जन्माने मिळालेल उच्च जातीयत्व पुरुषत्व, ऐश्वर्य जवळ असतानाही माझा शाहू राजा या असल्या फडतुस विचारांना अजिबात जागा देत न्हवता. माझ्या राजाने 'स्त्री मुक्ती असावी आणि त्यात माझी बायको, बहीणच नाही तर माझी सुनही असावी' हा विचार स्वतः जगला.


त्यानं स्वतः च्या कृत्यातून आदर्श घालून दिलाय तो. त्यांच्या स्त्री-सक्षमीकरणाविषयीच्या योगदानाबाबत अनेकांना माहीती आहे, पण त्या स्त्री सक्षमीकरणाची सुरवात त्याने स्वतःच्या घरातून केली हे अनेकांना ठाऊक नाही. शाहू राजाचे स्त्री-शिक्षणाविषयीचे विचार हे त्याने त्याच्या व्यक्तीगत आयुष्याशीही जोडून घेतलेले होते. त्याने ते इमाने-इतबारे आयुष्याच्या शेवटपर्यंत जगले होते. आज त्याची पुण्यतिथी. आणि त्या निमित्ताने बऱ्याच दिवसांपासून शाहू आणि त्यांच्या सुन असलेल्या प्रिन्स शिवाजीराजे यांच्या पत्नी इंदुमतीमहाराजसाहेब यांच्या भावनिक आणि प्रेमळ नात्यासंबंधी लिहावंस वाटत होत ते इथे उतरवतो आज.


छ. शाहू आणि त्यांच्या सुन असलेल्या इंदुमती महाराजसाहेब यांच्यातील ॠणाणूबंधाबाबत अनेकांना विशेष माहीती नाही. इंदूमती महाराजसाहेबांच्या शिक्षणासाठी महाराज घेतलेले कष्ट हे फक्त इतिहासाच्या पानांतच दडून राहीलेत, याविषयी कुणीही विशेष दखल घेतली नाही याची मोठी खंत वाटते.


इंदूमतीबाईसाहेब प्रिन्स शिवाजी यांच्याशी विवाहबद्ध होऊन जेंव्हा महाराजांच्या सून झाल्या तेंव्हा त्यांच वय केवळ दहा वर्ष होत. शाहूंनी इंदूमती महाराजसाहेबांची सून म्हणून निवड करताना तोलामोलाच घराणं, सौंदर्य, संपत्ती असले कसलेही निकष समोर ठेवले नव्हते. इंदुमती महाराजसाहेबांच्या वधूपरिक्षेवेळचा किस्साही भन्नाट आहे. वधूपरीक्षेवेळी त्यांना मराठी व्याकरणासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले होते, हे विशेष. त्या घटनेतून महाराजांच्या भावी सुनेविषयीच्या असलेल्या आशा आकांक्षा प्रतित झालेल्या आहे.


जून 1917 मध्ये प्रिन्स शिवाजीराजे आणि इंदुमती महाराजसाहेब यांचा विवाह झाला आणि दुर्देवाने अवघ्या एका वर्षानंतर रानडुक्कराच्या शिकारीला गेलेल्या प्रिन्स शिवाजीराजे यांच घोड्यावरुन पडून अपघाती निधन झाल. तेंव्हा इंदुमती महाराजसाहेब केवळ अकरा वर्षांच्या होत्या. पुत्राच्या निधनाने घायाळ झालेले शाहू राजे सुनेच्या चिंतेनेही तितकेच व्याकूळ झाले होते. महाराजांचे सहकारी असलेल्या दादासाहेब तोफखानें याच्या स्मृतीकथनात महाराज हे सतत इंदुमती महाराजसाहेबांबत चिंतीत असायचे अशी नोंद तोफखानेंनी केलीय. त्यांच्या भावी आयुष्याबाबत काय करता येईल याबाबत सतत चर्चा करत असायचे. खुप विचारांती महाराजांनी इंदूमतीबाईसाहेबांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांचा विचार फक्त इंदूमतीबाईसाहेबांना शिक्षण देण्यापुरता मर्यादित नव्हता तर त्यांना इंग्रजी आणि संस्कृत या दोन्ही भाषा आणि साहित्याच शिक्षण देऊन त्यांच्याकडे संस्थानातील शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवायच महाराजांनी ठरवल होत. राजस्त्रीयांच नखही लोकांच्या नजरेस पडता कामा नये अशा विचारसणीच प्रभुत्व समाजावर असतानाच्या काळात कुटूब, भावकी आणि समाजाकडुन होणाऱ्या तीव्र विरोधाला झुगारुन महाराज त्यांच्या निर्णयावर ठाम राहीले.


इंदूमतीबाईसाहेबांना शिक्षण देण्यासाठी पाच शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शिकण्यासाठी इतर चार मुली निवडल्या, त्यापैकी एक ख्रिश्चन मुलगीही होती. पण राजवाड्यात या निर्णयाला विरोध होऊ लागला, खुद्द महाराणी लक्ष्मीबाईंसाहेबांनीही याला टोकाचा विरोध केला. पण विरोधाला जुमानेल तो शाहू राजा कसला??? यातून मार्ग म्हणून राजाने सोनतळीच्या बंगल्यात ही शाळा सुरु केली. या घटनेत आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निवडलेल्या पाच शिक्षकांपैकी एक भार्गव कुलकर्णी नावाचे शिक्षक फार विक्षिप्त आणि तापट स्वभावाचे होते. त्यांच्या विक्षिप्त स्वभावाची कल्पना जेंव्हा महाराजांना दिली तेंव्हा महाराज म्हणाले, " माझ्या सुनेला जोवर ते उत्तम शिक्षण देत राहतील तोवर त्यांनी माझा मान राखला नाही तरी चालेल, मला त्यांनी मुजरा करायचीही गरज नाही, उलट मीच त्यांना नमस्कार घालत जाईन".


इंदूमतीमहाराजसाहेबांच्या शिक्षण प्रकारामुळे शाहूंच कुटूंब खुप नाराज होत त्यांच्यावर. इतकं की कुटुंबियांनी त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांना मुजरा करण ही बंद केल होत. पण राजांने त्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केल. आपल्या सुनेच्या शिक्षणासाठी स्वतःच्या मानापमानाचा, प्रतिष्ठेचा, राजेपणाचा कसलाही प्रश्न मध्ये येऊ न देणारा जगाच्या इतिहासात एकमेव राजा असेल तर तो माझा शाहू राजाच.


महाराज इंदूमतीबाईसाहेबांना शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी लिहिलेल्या पत्रात शाहू म्हणतात," शिक्षणामुळे तुझी बुद्धी जशीजशी विकसित होईल तसतसे तुझे विचार अधिक उदात्त होत जातील. म्हणून अभ्यासाची हेळसांड करु नकोस, कंटाळा करु नकोस. तुला सुशिक्षित विदुषी करावे अशी माझी फार इच्छा आहे".


इंदूमतीबाईसाहेबांनी डाॅक्टर व्हावे अशी महाराजांची इच्छा होती. 1921 मध्ये माॅन्टगोमेरी यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या विधवा सुनेला लेडी डाॅक्टर बनवायची इच्छा महाराजांनी व्यक्त केली होती.. त्यांच्या वैद्यकिय शिक्षणासाठी महाराजांनी दिल्लीच्या लेडी हाॅर्डींग्ज जनाना मेडिकल काॅलेजशी संपर्क साधला होता. त्यांना एकदा सोबत दिल्लीला नेऊन त्यांची ओळख मेडिकल काॅलेजच्या प्रमुखांशी दिली होती. दिल्लीत इंदूमतीबाईसाहेबांना राहता याव म्हणून एक बंगलाही विकत घेतला होता. महाराजांनी स्वतःचे मृत्यूपत्रही करुन ठेवले होते त्यात त्यांनी इंदुमतीबाईसाहेबांचे दाग-दागिणे, पैसे, निर्वाह आणि निवासाची कायमची सोय करुन ठेवली. राजवाड्यापासून दूर इंदूमती हाॅल नावाने एक वास्तू बनवली. स्वतःच्या संपत्तीचा वाटा देणार बाप-भाऊ आजही अत्यंत दुर्मिळ असताना, त्याकाळात शाहू राजाने मृत्यूपत्रात संपत्तीतील वाटा आपल्या सुनेच्या नावे केला होता.


दुर्दैवाने 6 मे1922 मध्ये मुंबईत पन्हाळा लाॅज या ठिकाणी महाराजांचं दुःखद निधन झाल आणि इंदूमतीबाईसाहेबांना डाॅक्टर बनवायच त्यांच स्वप्नही तिथेच संपुष्टात आल. महाराजांच्या निधनाने इंदूमतीबाईसाहेबांचा असलेला एकमेव आधारच निघून गेला. त्यांचा मार्गदर्शक, पिता, सासरा, जवळचा मित्र निघून गेल्याने त्याही पुढे शिक्षणासाठी विशेष धाडस दाखवू शकल्या नाहीत. महाराजांच्या शैक्षणिक आग्रहाचा सन्मान राखण्यासाठी मात्र त्यांनी घरच्या प्रंचंड विरोधाला तोंड देत मॅट्रीकची परिक्षा दिली आणि कोल्हापूर केंद्रात दुसरा क्रमांक पटवत त्यांच्या क्षमतेप्रमाणे महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.


#शाहूAuthor: Vikas Kamble, Freelance Auditor, Kolhapur


संदर्भ:-

1) राजर्षी शाहू गैरवग्रंथ. 2) क्रांतीसुत्ते 3) कित्ता

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn